Mumbai Cricket Association announces celebration to mark 50th anniversary of Wankhede Stadium
Mumbai Cricket Association announces celebration to mark 50th anniversary of Wankhede Stadium
मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) वानखेडे स्टेडियमच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य सोहळ्याचं आयोजन १२ ते १९ जानेवारी २०२५ दरम्यान करणार आहे. मुंबईचा अभिमान असलेल्या या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमचं ५०वं वर्धापनदिन साजरा करण्यासाठी जानेवारी २०२५ मध्ये खास कार्यक्रम होणार आहेत, असं मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी आज वानखेडे स्टेडियम इथं आयोजित वार्ताहर परिषदेत जाहीर केलं. तसंच ५०व्या वर्धापनदिनाच्या विशेष लोगोचं अनावरण करण्यात आलं. यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय नाईक, सचिव अभय हडप, सहसचिव दीपक पाटील आणि कोषाध्यक्ष अरमान मल्लिक, पदाधिकारी, सदस्य आदी उपस्थित होते. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी १९ जानेवारी रोजी वानखेडे स्टेडियमच्या समृद्ध वारशाचा सन्मान करण्यासाठी स्मृती टपाल तिकीट आणि एक कॉफी टेबल बुक प्रकाशित करणार असल्याचं सांगितलं. या ऐतिहासिक स्टेडियमला सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि इतर दिग्गज क्रिकेटपटूंच्या खेळानं गौरव मिळाला आहे. एमसीए १९ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करणार आहे. ५ ०व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्याची सुरुवात १२ जानेवारी २०२५ ला होईल आणि १९ जानेवारी २०२५ ला वानखेडे स्टेडियममध्ये एका भव्य समारंभानं या कार्यक्रमांचा समारोप होईल. १९ जानेवारीला होणाऱ्या सोहळ्यात मुंबई आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील दिग्गज आजी-माजी क्रिकेटपटू एकत्र येतील. या विशेष कार्यक्रमात प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते आणि संगीतकार अजय-अतुल यांचं सादरीकरण आणि एक लेझर शो होईल. एमसीए १२ जानेवारीला एमसीए अधिकारी आणि वाणिज्य दूत, प्रशासक यांच्यात क्रिकेट सामना आयोजित करणार आहे. तसंच १५ जानेवारीला एमसीएच्या क्लब्स आणि मैदानांच्या ग्राउंड्समनसाठी विशेष भोजनाचं आयोजन करण्यात येणार आहे, ज्याद्वारे मुंबई क्रिकेटच्या या अनामिक नायकांच्या योगदान आणि समर्पणाचा सन्मान केला जाईल.