Trending

Navi Mumbai Garden Workers Protest: नवी मुंबईतील उद्यान कामगारांचा संताप; बेलापूरमध्ये आमरण उपोषण

Navi Mumbai Garden Workers Protest: Garden workers in Navi Mumbai are angry; Fast to death in Belapur

नवी मुंबई/सुमित गायकवाड: नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागात कार्यरत असलेल्या कामगारांना किमान वेतन दिले जात नसल्याच्या मुद्द्यावरून आता कामगारांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. समाज समता कामगार संघाच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनामुळे उद्यान विभागातील गैरव्यवहारांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या बेलापूर ते दिघा विभागीय कार्यक्षेत्रात एकूण 17,00,503 चौरस मीटर क्षेत्रफळात विविध उद्याने विकसित करण्यात आली आहेत. महापालिकेच्या धोरणानुसार, 2,200 चौरस मीटर क्षेत्रासाठी एक कामगार नेमणे बंधनकारक आहे. या प्रमाणात एकूण 773 कामगारांची आवश्यकता आहे. मात्र सध्या केवळ 450 ते 500 कामगारांवरच काम भागवले जात आहे. उर्वरित सुमारे 200 कामगारांचे वेतनाचे पैसे अधिकारी आणि ठेकेदार दरमहा आपसात वाटून घेत असल्याचा गंभीर आरोप कामगार संघटनेने केला आहे.

याशिवाय सध्या कार्यरत असलेल्या कामगारांनाही किमान वेतन मिळत नाही. एका कामगारावर महापालिका प्रतिमहा सुमारे 27,000 रुपये खर्च दाखवते, परंतु प्रत्यक्ष कामगारांच्या हातात फक्त 12,000 रुपये पगार मिळतो. उरलेली रक्कम कुठे जाते, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

या अन्यायाविरोधात अनेकदा पत्रव्यवहार करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले. परिणामी आज कामगारांना आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला. या उपोषणात सहभागी झालेल्या 25 कामगारांचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाबासह इतर आजार आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती संघटनेने व्यक्त केली आहे.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, कामगार आणि त्यांचे वारस किमान वेतन व लेव्हीच्या हक्कांपासून वंचित आहेत. याच न्यायासाठी ते आमरण उपोषण करत असून प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी, अन्यथा मोठ्या आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker